अधिष्ठाता डॉ. फुलपाटील ‘इंस्पेकशन” ला गेल्याने नाराजी

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी ऑक्सिजनचे पीएसए जनरेशन प्लांटचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे केलेले संबोधन पालकमंत्र्यांसहित लोकप्रतिनिधी व डॉक्टरांनी देखील ऐकले. मात्र, पंतप्रधान, पालकमंत्री उपस्थित असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील एमसीआयच्या ‘इंस्पेक्शन’साठी सुट्टी टाकून निघून गेल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. त्यानंतर पंतप्रधान यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधन केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ फोडून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते.

प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व बरे करण्यासाठी योगदान देईल यात शंका नाही, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटचे मान्यवरांनी पाहणी करीत कौतुक केले. कार्यक्रमासाठी ऑक्सिजन प्लांटचे समन्वयक डॉ.संदीप पटेल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विलास मालकर यांच्यासह डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ.वैभव सोनार, डॉ.योगिता बावस्कर, डॉ.उमेश जाधव, असिस्टंट मेट्रेन आशा चिखलकर यांच्यासह अधिकारी दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, संजय चौधरी, संजय पाथरूट, महेश गुंडाळे आदी अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

काय आहे हा प्लांट ?
करोना संसर्ग आजाराच्या उद्रेक परिस्थितीत ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत जीवरक्षक वायू ठरत आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढून त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी यासाठी पी एस ए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली.
सदर प्लांट द्वारे हवेतुनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजन कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला आहे.
अधिष्ठाता डॉ. फुलपाटील ‘इंस्पेकशन” ला गेल्याने नाराजी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदी यांनी ऋषिकेश येथे केलेले संबोधन पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व डॉक्टरांनी ऐकले. मात्र, या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील एमसीआयच्या ‘इंस्पेक्शन’साठी सुट्टी टाकून निघून गेल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत पालकमंत्र्यांची नाराजी दिसून आली. पंतप्रधान, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम असताना इंस्पेक्शन पुढे ढकलता येऊ शकत होते. मात्र डॉ. फुलपाटील सर्रास ४ दिवसांची सुट्टी टाकून निघून गेल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उमटू लागले आहे.
डॉ. फुलपाटील यांनी २४ दिवसांपूर्वी अधिष्ठातापदाचा एकतर्फी पदभार घेतल्यानंतर प्रोटोकॉल म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना एकदाही भेटायला गेलेले नाहीत. तसेच, पत्रकारांना कक्षाबाहेर काढणे , लोकप्रतिनिधींशी बोलणे टाळणे अशा मग्रूर स्वभावामुळे डॉ.फुलपाटील चर्चेत आहेत. रुग्णालयात दिवसातून एकदाही रुग्णांबाबत विचारपूस करायला राउंड घेत नसल्याने शिस्तदेखील बिघडली असल्याचे दिसून येत आहे.







