जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून शासन निर्णय जारी केला आहे.

शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आजारांवर उपचार होणे महत्वाचे आहे. योग्य निदान करण्यासाठी पुरेशा विशिष्ट चाचण्या, परीक्षणे उपलब्ध नसल्याने मानसिक रोगाचे निदान करणे कठीण असते. सद्यस्थितीत मराठवाडा मध्ये एकही प्रादेशिक मनोरुग्णालय अस्तित्वात नाही. जालना जिल्हा हा मराठवाड्यातील १० जिल्हे, विदर्भातील काही जिल्हे आणि खान्देशला मध्यवर्ती भागात आहे. येथील रुग्णांना उपचारासाठी पुणे, ठाणे अथवा नागपूर येथे जावे लागते. हि वस्तुस्थिती पाहता जालना जिल्ह्यात प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.
त्याबाबत ३ ऑगस्ट रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मनोरुग्णालयाला मान्यता देण्यात आलेली आहे. आता शासन निर्णय जारी झाला आहे. त्यानुसार सदर ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास मान्यता व पदनिर्मिती याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.







