नांदेड ( वृत्तसंस्था )- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर येथील रेणूका मातेच्या नवरात्रोत्सवाची तयारी सुरु आहे. तहसील कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली.दोन वर्षानंतर गडावर यात्रा भरणार असल्याने प्रशासनाकडूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

07 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवसापासून भाविकांना पहाटे पाच वाजेपासूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरात प्रवेशासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारचे पास दिले जाणार नाहीत, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी दिली. भाविकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत दर्शनासाठी येण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
माहूर गडावर भाविकांसाठी दुकानांवर मास्क, सॅनिटायझर आदी उत्पादने उपलब्ध असतील. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गडावर ने-आण करण्यासाठी 80 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी 15 आणि 185 पुरुष पोलीस, 65 महिला पोलीस, शहर वाहतूक शाखेचे 40 कर्मचारी आणि पुरुष होमगार्ड 200, महिला होमगार्ड 100 असावेत, अशी मागणी पोलिस विभागाकडे करण्यात आली आहे. नगरपालिकेकडून स्वच्छता, कंट्रोल रुम, फिरते शौचालय, पिण्याचे पाणी, धूर फवारणी, पार्किंग व्यवस्था आदी सुविधा पुरवण्यात येणार आहे .
या काळात वणीचे सप्तश्रृंगी मंदिरही खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. नवरात्रच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे.







