जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी एकतर्फी रुजू झाल्यानंतर अद्यापही पालकमंत्र्यांची भेट घेतली नाही. प्रोटोकॉलनुसार श्रेणी १ वर्गाचा तसेच एखाद्या सरकारी संस्थेचा अधिकारी मुख्य पदाचा पदभार घेतो त्यानंतर त्याने पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट घेणे क्रमप्राप्त असते. मात्र डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी २२ दिवसांपासून एकतर्फी पदभार घेतल्यानंतर पालकमंत्र्यांची अजूनही भेट घेतली नसल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. तसेच, पत्रकारांना कक्षातून अपमानास्पदरित्या बाहेर हाकलणे, लोकप्रतिनिधींशी बोलणे टाळणे अशा मग्रुरीमुळे पालकमंत्री देखील नाराज झाल्याचे वृत्त आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे गेल्या साडेचार वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. या महाविद्यालयाचा जिल्हा सामान्य रुग्णालयाशी करार झाल्यानुसार गोरगरीब जनतेसाठी महत्वाचे असणारे रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) देखील या महाविद्यालयाला अधिग्रहित झालेले आहे. अशा महत्वाच्या संस्थेचा प्रमुख म्हणून अधिष्ठाता पदाच्या व्यक्तीवर विद्यार्थी आणि रुग्णांची दुहेरी मोठी जबाबदारी असते. अधिष्ठाता म्हणून महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकासासाठी, विविध विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागत असतो. तसेच, प्रोटोकॉल म्हणून पदभार घेतल्यानंतर पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट घेणे महत्वाचे असते. पालकमंत्री हे एकप्रकारे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी असतात.
डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार दिलेला नसताना तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून आलेल्या आदेशातील चौथ्या मुद्द्याचा आधार घेत नागपूर येथून आलेले डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी अधिष्ठाता पदाचा एकतर्फीपणे १३ रोजी पदभार घेतला. यामुळे डॉ. फुलपाटील यांच्याविरोधात नाराजी पसरलेली आहे. डॉ. रामानंद यांनी ज्या वेळेला पदभार घेतला त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांना भेटले होते. तसेच, वेळोवेळी, पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून महाविद्यालय व रुग्णालयाशी संबंधित विविध विषय मार्गी लावले आहे. मात्र फुलपाटील यांनी स्वतः एकदाही पालकमंत्र्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे त्यांची मग्रुरी कायम असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृती संदर्भात चौकशीसाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फोन केला होता. ‘त्यांना लावायचा तर ते मला फोन लावतील’ असे म्हणत फोन देखील डॉ. फुलपाटील यांनी घेतला नाही. तसेच, ‘मार्ड’ च्या संपाबाबत व आरोग्य जनजागृतीबाबत प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या वृत्तवाहिन्यांच्या ४ ते ५ पत्रकारांना ‘बाहेर जा, गर्दी करू नका’ म्हणत अपमानास्पद वागणूक दिली आहे. काही दैनिकांच्या पत्रकारांना देखील चांगले अनुभव आलेले नाही. त्यामुळे डॉ. फुलपाटील यांच्या कारभारावर नाराजी पसरली आहे. या प्रकारांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे माहिती गेली असून पालकमंत्री नाराज झाल्याचे वृत्त आहे.