चाळीसगाव –– देशात लॉक डाऊनची परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅकेज जाहीर करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.मोफत तांदूळ, मोफत उज्वला गॅस हंडी ,जनधन खात्यात पाचशे रुपये असो वा किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये अशा सर्वच योजनांचा लाभ कुठलाहा त्रास न होता थेट जनतेला मिळाला आहे. मागील काही वर्षात समाधान शिबीर असो वा शासकीय योजनांची जत्रा यामुळे वंचित लाभार्थ्यांची नोंद करून त्यांना विविध योजनांमध्ये सामील करून घेतल्याने सर्वाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करून घेतली.परिणामी जिल्ह्यात सर्वाधिक लाभ चाळीसगाव तालुक्यात मिळाला आहे अशी माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पातळीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा व यंत्रणेला मार्गदर्शन सूचना देण्यासाठी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पाच वाजता तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड , ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे, ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉ.बी पी बाविस्कर, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील निकम, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे ,विस्तार अधिकारी के एन माळी, गोपनीय शाखेचे गणेश पाटील आदी अधीकारी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयास 35 सेफ्टी किट आणि लवकरच व्हेंटिलेटर
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कोरोनाच्या उपाययोजना बाबत आढावा घेत आरोग्य विभागाला काही अडचणी आहेत का असतील तर त्या मांडाव्यात अशी विचारणा तालुका आरोग्य अधीकारी डॉ. लांडे यांना केली यावर खासदार महोदय आपण साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली यांवर खासदार उन्मेश दादा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागोजीराव चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क ग्रामीण रुग्णालयाने मागणी केलेल्या दोनशे पी पी ई किट पैकी ताबडतोब 35 कोरोना सेफ्टी पी पी ई किट उपलब्ध करून द्याव्यात.असे सांगून उद्याच गाडी पाठवावी आणि हे साहित्य घेवून या. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लांडे यांना सांगितले लवकरच ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली. तसेच येत्या काळात लॉकडाऊन मधील अडकलेल्या लोकांसाठी अंधशाळा परिसरात तसेच गरज भासल्यास तालुक्यातील आश्रमशाळा मध्ये निर्वासित लोकांची सुविधा करण्यासाठी नियोजन करावे जेणेकरून लॉक डाऊन काळात कोणीही दोन वेळेच्या अन्नापासून वंचित राहू नये.याची काळजी घ्यावी
शासन आणि लोकप्रतिनिधी समन्वय ठेवा
रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे आदेश आले असून वाढलेल्या मजुरी दराप्रमाणे गटविकास अधिकारी यांनी याबाबत ताबडतोब कार्यवाही सुरू करावी.चाळीसगाव पंचायत समितीने ज्याप्रमाणे राज्यात सर्वाधिक गाय गोठा शेड योजनेतून लाभार्थ्यांचा उच्चांक केला.या पद्धतीने येत्या काळात घरकुल वा इतर योजनांचा कामाचा वेग वाढवून शेवटच्या घटकांना लाभ मिळवून मिशन मोड काम करावे. यावेळी सभापती अजय पाटील ,उपसभापती सुनील पाटील यांनी बीडीओ आम्हाला विश्वासात घेत नाही व प्रत्यक्षस्थळावर जात नाही अशी तक्रार केली.खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वय ठेवावा.हवे तर सॊबत दौरे करा.सध्या कोरोना आजाराशी लढतांना ग्रामीण भागात आपण विशेष लक्ष द्या.अशा स्पष्ट सूचना दिल्यात यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सर्वच अधिकारी पदाधिकारी यांच्या सूचना व मते जाणून घेतली.बैठकीत उसतोड कामगार, शासकीय कापूस खरेदी, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी प्रोत्साहन अनुदान वाटप, बांधकाम कामगार व मच्छीमार सोसायटी अनुदान या सर्व बाबींचा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले.
जिल्हयात चाळीसगावात सर्वाधिक लाभार्थी
समाधान शिबिर व शासकीय योजनांची जत्रेमूळे जिल्ह्यात केंद्राच्या पॅकेजचा चाळीसगावात सर्वाधिक लाभ मिळाला असून यात
६२ हजार कुटुंबांतील ३ लाख लोकांना मोफत तांदूळ,
३२ हजार उज्वला गॅस लाभार्थ्यांना प्रति ७४४ रुपये प्रमाणे २ कोटी ४० लाख रुपयांचा खात्यात प्रत्यक्ष लाभ,
१लाख पेक्षा अधिक जनधन खातेधारक प्रति पाचशे रुपयांप्रमाणे ५ कोटी १५ लाख
तसेच ६ हजार शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना २ हजार रुपयांप्रमाणे १ कोटी २१ लाख रुपयांचा लाभ मिळाला असून जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी चाळीसगाव तालुक्यात आहे. लाभार्थ्यांनी देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रती आदरभाव व्यक्त करत आभार मानत असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.