मुंबई (वृत्तसंस्था) – कोविड-19 या आजाराची भारतीय नौदलाच्या जवानांनाही लागण झाल्याचे समोर आले आहे. नौदलाचे 21 जवान कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या सर्व बाधितांना मुंबईतील नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमणाची नौदलातील ही पहिली घटना आहे. तथापि, नौदलाकडून याबाबत अद्याप कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. हे सर्व जवान 7 एप्रिल रोजी चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या खलाश्यांच्या संपर्कात आले होते. आयएनएस आंग्रे हे युद्धपोत वेस्टर्न नेव्हल कमांडच्या नौदल कार्यात रसद व प्रशासकीय साहाय्य पुरवण्याचे काम करते. नौदल अधिकारी संक्रमित जवानांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहेत. संक्रमित जवान कोणकोणत्या ठिकाणी ड्यूटीवर किंवा इतर कामावर गेले याचीही माहितीही घेतली जात आहे. आयएनएस आंग्रे आता लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व निवासी ब्लॉकची तपासणी करण्यात येत असून यास कंटेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले गेले. ही सर्व कारवाई प्रोटोकॉलनुसार केली जात आहे.17 एप्रिल रोजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी सांगितले होते की, सैन्यात कोरोना संसर्गाची 8 प्रकरणे नोंदवली गेली होती. यामध्ये दोन डॉक्टर आणि एक नर्स यांचा समावेश आहे. त्याच वेळी आमच्या सैन्याने ज्यांना कोणत्याही कोरोना संक्रमित व्यक्तीशी संपर्क साधला नाही, त्यांना पुन्हा युनिटमध्ये आणले जात आहे. यासाठी सैन्याने दोन विशेष गाड्यांची एक बंगळुरूहून जम्मू आणि दुसरी बंगळुरू ते गुवाहाटीपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे.








