मुंबई ( वृत्तसंस्था ) – परीक्षा आयोजनाचे काम दिलेल्या कंपनीने परीक्षा केंद्रेच तयार केली नसल्याने ऐनवेळी आरोग्य खात्याच्या गट क आणि ड च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला असा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा ही २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबरला होणार होती. मात्र ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राजेश टोपे म्हणाले, परीक्षा घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून खासगी कंपन्या निवडल्या जातात. या कंपन्या परिक्षेसाठीचं सगळं नियोजन करतात. राज्य शासन फक्त पेपर काढण्याचं काम करतं. सध्या परिक्षेचे पेपर छापून तयार आहेत. या परिक्षेसाठी निवडलेल्या कंपनीने बरीचशी कामं केली आहेत. मात्र, जी वेळेत करायला हवीत ती केलेली नाहीत. त्याचा सातत्याने पाठपुरावा आरोग्य विभाग करत होतं. मात्र, काही गोष्टी त्यातून राहून गेल्या. केंद्र तयार करण्या संदर्भातली काही कामं राहून गेल्याचं आमच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर ही कामं पूर्ण करण्यासाठी या कंपनीने अजून आठ दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा नक्कीच होणार आहे , असेही ते म्हणाले .
या कंपनीने असमर्थतता दाखवल्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यांच्याबरोबर रात्री उशीरापर्यंत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. या प्रकाराचा आरोग्य विभागाशी थेट संबंध नसला तरी आम्ही उद्याच बैठक घेऊन तारीख सर्व परिक्षार्थ्यांना कळवली जाईल. काळजीचं काही कारण नाही , असेही ते म्हणाले .







