जळगाव ( प्रतिनिधी ) – गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे.
कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील यशस्वी उपचारानंतर 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे.
गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील सुविधांची काटेकोर पाहणी, पडताळणी राज्य व केंद्र शासनाच्या समितीने केली. या समितीच्या अहवालानुसार शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना या रुग्णालयाला मंजूर केली आहे. आता या रुग्णालयात गरजू, सामान्य रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड सेवा व विविध आजारांवरील उपचार एकाच छताखाली उपलब्ध असल्याने मोफत उपचारासाठी नागरिकांना लाभ होणार आहे. या मोफत उपचारात विविध प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार यंत्रणा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेताना रुग्णालयातील उच्च दर्जाच्या सुविधांचा लाभ घेण्याचे समाधान मिळणार आहे.
देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये रुग्णांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज स्वतंत्र विभाग तत्पर ठेवण्यात आले आहेत. मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया, मूत्रविकार व किडनीचे विकार, क्रिटिकल केअर मेडिसिन, प्लास्टिक शस्त्रक्रिया यासाठी सुपरस्पेशलिटी विभाग कार्यरत आहेत. बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, जनरल शस्त्रक्रिया, अपघातातील जखमींवरील शस्त्रक्रिया, दंतरोग, त्वचा व गुप्तरोग, छातीचे विकार, फिजिओथेरपी विभाग या विभागाद्वारे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असून 14 खाटांचा उपकरणांनी सुसज्ज आयसीयू विभाग आहे. गरजू रुग्णांना 24 तास ऑक्सिजनची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. नितिन पाटील मो क्रमांक 9422977071 व 7507724200 या वर संपर्क साधावा, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.