जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज जिल्हा बैठक सुरु असताना सभागृहातून एका कार्यकर्त्याचे पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर थोडा वेळ गोंधळ झाला होता.

आज 2 वाजता जिल्हा बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून जवळपास ५०० च्या वर कार्यकर्ते सह जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी , माजी आमदार , सर्व आघाड्यांचे पदाधिकारी आलेले होते. सूत्रसंचालकांनी संदीप पाटील नावाच्या कार्यकर्त्याचे पाकीट मारले गेल्याचे व्यासपीठावर जाहीरपणे सांगितल्यानंतर सर्वच जण बुचकळ्यात पडले होते. काही जण म्हणत होते की चुकून ते पाकीट संदीप पाटील यांच्याकडूनच नजरचुकीने अन्यत्र गहाळ झाले असावे. तथापि काही जणांच्या संशयी नजरांनी आणि चर्चेने या बैठकीत वेगळाच रंग भरला गेला. काही चौकस कार्यकर्ते पोलीस तक्रारीचा सल्ला देत होते. तर काही जण फार मोठी रक्कम नसेल तर विषय सोडून द्या असा सल्लाही देत होते. व्यासपीठ सोडून समोरच्या कार्यकर्त्यांच्या बैठक व्यवस्थेत शोधाशोध सुरु झाल्यावर पाकीट मारणारा आता जास्त वेळ येथे कशाला थांबेल असाही अंदाज लावत होते. संदीप पाटील यांच्या पाकिटावर सुरुवातीपासून लक्ष ठेऊन संधी मिळताच कुणीतरी हात साफ केला. त्यामुळे आता जास्त तर्क लावण्यात अर्थ नाही, असा सल्ला देणारेही बरेच होते. या पाकिटात १६ हजार रुपये होते असे सांगण्यात आले.







