मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. त्याचा फटका खानवेलकडे जाणाऱ्या तीन प्रवाशांना बसला. गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना दगड व इतर साहित्याने मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री 9: 30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान दाभाडी – खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केल्याची माहिती पुढे आली आहे. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या वाहनांची नासधूस केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.








