रुग्णालयाचा कायापालट तसेच रुग्णसेवेत दमदार कामे केल्यामुळे बदली होणार रद्द ?
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे आज गुरुवार 26 ऑगस्ट रोजी राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात बाबत आदेश काढण्यात आले. यामध्ये जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांचे आदेश पारित झाले आहे. मात्र डॉ. रामानंद यांची जनहिताची कामे व रुग्णसेवेमध्ये लोकप्रिय असल्याने बदली रद्द होण्याबाबत पालकमंत्र्यांच्या पातळीवरून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी १३ जून २०२० साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. रुग्णालयामध्ये भुसावळ येथील रुग्ण मालती चुडामण नेहेते या ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हलगर्जी केल्यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह पाच जणांचे निलंबन राज्य शासनाने केले होते. त्या वेळेला अत्यंत बिकट आणि दयनीय अवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावची झाली होती.
प्रसंगी राज्य शासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव धुळे येथील डॉ. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख व राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय, कोल्हापूरचे अधिष्ठाता राहिलेले डॉ. जयप्रकाश रामानंद यांची अधिष्ठातापदी नेमणूक व्हावी अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची नियुक्ती शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावात केली होती.
गेल्या सव्वा वर्षापासून डॉ. रामानंद यांनी महाविद्यालय व रुग्णालयाचा पूर्ण कायापालट करून रुग्णसेवेचा दर्जा उंचावला. रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी कुठलीही अडचण होऊ नये यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती आणि व्यवस्थापन तयार केले. दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही सोपी व्हावी यासाठी पारदर्शक कुपन प्रणाली सुरू केली. यासह अनेक चांगले बदल ‘न भूतो न भविष्यती’ या प्रकारे डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात जळगावचा नावलौकिक झाला.
खुद्द पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील, ‘मंत्रिमंडळात माझी कॉलर ताठ झाली’ अशी प्रतिक्रिया दिली होती. हे सर्व लक्षात घेता डॉ. रामानंद यांची बदली रद्द व्हावी यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाकडे विनंती केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
तसेच जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता असलेले डॉ.भास्कर खैरे यांचे निलंबन झाले होते. त्यांना नंतर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालयात नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र विभागात प्राध्यापकपदी पदस्थापना देण्यात आली होती. त्यांनाही अंबेजोगाईच्या याच महाविद्यालयात अधिष्ठाता पदाचा कार्यभार आजच्या आदेशानुसार देण्यात आला आहे.
यांच्या झाल्या बदल्या
डॉ. श्रीनिवास शिंत्रे (वसंतराव नाईक महाविद्यालय, यवतमाळ), डॉ. अशोक नितनवरे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर), डॉ.भालचंद्र मु-हार (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद. हे १ ऑक्टोबर रोजी पदभार घेतील), डॉ. भावना सोनवणे (इंदिरा गांधी महाविद्यालय, नागपूर), डॉ. प्रदीप दीक्षित, राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय, कोल्हापूर, डॉ. अपूर्व पावडे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया), डॉ. भास्कर खैरे (स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबेजोगाई), डॉ. महेंद्र कुरा (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग), डॉ. विनायक काळे (बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे) यांना कंसात दर्शविलेल्या महाविद्यालयात अधिष्ठाता पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.







