तळोदा (प्रतिनिधी) – तळोदा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र तळोदा नगरपालिके कडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने शहरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे काही भागात तर गटारी तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी वाहून नेणार्या गटारींमध्ये प्लास्टिक तुंबून पाणी वाहणे बंद झाले आहे.अधून मधून बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यात डासांची संख्या वाढत असते. शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे दिसत आहे.
प्रत्येक घरी डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.डासांमुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, येलो फीवर, झिका, मलेरिया, वेस्ट नाइल फिव्हर, जापनीज, एन्सेफलाइटस्, हत्तीपाय इत्यादी घातक आजार होत असतात. डासांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती आढळून.येतात व वेगवेगळे रोग पसरतात.
यासाठी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिकेने मोहीम राबवावी
सांडपाणी व शहरातील घाण पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.टायफाईड व मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. डेंग्यूचीही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. पालिकेने शहरात डास निर्मूलनासाठी किंवा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरीकांनकडुन केली जात आहे.
कोरोना आणि व्हायरल फीवरमध्ये कंफ्यूजन
जिल्ह्यासह तळोदा तालुकादेखील कोरोनामुक्त झाला आहे. मात्र कोरोना आणि व्हायरल फीवरची काही लक्षणे सारखी असल्यामुळे दोन्ही मध्ये कंफ्यूजन होत असल्याचे दिसून येते आहे. व्हायरल फीवर झालेली रुग्ण कोरोनाच्या भीतीने घाबरत आहेत पण टेस्टिंगनंतर फीवर असल्याचे समोर येत आहे.पावसाच्या वातावरणात व्हायरल फीवर पसरत असतो, त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणे आहे.







