देवळी – देशासह जगभरात कोरोना विषाणूमुळे हाहाकार उडालेला असताना कोरोना च्या प्रदूर्भावापासून आपले गाव सुरक्षित राहावे म्हणून चाळीसगाव तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. गावातील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेत गावात बाहेरून येणाऱ्यावर लक्ष ठेवले जात असून यात अजून एका उपक्रमाची भर पडली आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चातून गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे. चाळीसगाव तालुक्यात प्रथमच यापद्धतीने निर्जंतुकीकरण व्यवस्था देवळी ग्रामपंचायतीने केली असल्याने या अभिनव उपक्रमाची पाहणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देवळी येथे भेट देत केली व त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले.
गावात येणाऱ्या २ प्रवेशद्वारांवर ही व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत देखरेख केली जाणार आहे.
सदर निर्जंतुकीकरण साठी सॅनीटायझिंग लिक्विड वापरले जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक एस.के.तेली यांनी दिली.
सर्वांच्या सहकार्याने उपक्रम – अतुल पाटील
आपले गाव कोरोना पासून सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून ग्रामपंचायत देखील आपापल्या पध्दतीने उपाययोजना राबवित आहे. चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी देवळी गावात करता आली याचा आनंद असून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपक्रमाचे भेट देत कौतुक केल्याने आम्हा सर्वांचा काम करण्याचा उत्साह वाढला आहे. यापुढेही गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविल्या जातील अशी प्रतिक्रिया देवळीचे उपसरपंच अतुल पाटील यांनी दिली. गावात आरोग्यसेवक हेमंत चौधरी यांच्या देखरेखीखाली आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामस्थांवर लक्ष ठेवत बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांची नोंद केली जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.