मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. हा लॉकडाऊन उठल्यावरच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. राज्यातील विविध ठिकाणी करोना विषाणूचा प्रभाव गेल्या महिन्यापासून वाढतोच आहे. त्यामुळे शासनाने आधी संचारबंदी लागू केली. त्यानंतर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर त्यात आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी नुकतेच नवीन आदेशाचे पत्र जारी केले आहे. हे पत्र शिक्षण आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष यांना पाठविले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका घरी बसून तपासणीस पूर्वीच परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, काही विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळांच्या कस्टडीत, मॉडरेटरकडेच पडून आहेत. तसेच तपासलेल्या उत्तरपत्रिका विभागीय शिक्षण मंडळाकडे सबमिशन करण्यातही अडचणी येत आहेत.शिक्षकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज वेगाने होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावरच शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तर, दहावीचा भूगोल व कार्यशिक्षण या विषयाचीही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धती नुसार या दहावीच्या रद्द झालेल्या विषयी गुण देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षात 14 एप्रिल नंतर ही पुन्हा शाळा सुरु करण्यात येऊ नयेत, असे उपसचिव पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रच्या परीक्षा न घेता प्रथम सत्र परीक्षेतील तसेच चाचण्या, प्रात्यक्षिक व अंतर्गत मुल्यमापनातील प्राप्त गुणांचा विचार करुन त्या आधारे विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात येणार आहे.