जळगाव (प्रतिनिधी) – नवजात बालकाला उपचारासाठी घेवून जातांना झालेल्या दिरंगाईमुळे जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण यांनी १०८ रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक राहुल जैन, तसेच जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. उमर देशमुख यांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले असून डॉ. उमर देशमुख यांना तत्काळ नोकरीवरुन काढून टाकण्याचे आदेश दिले आहे.
जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवजात बालकाला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार रुग्णांचे नातेवाईक फिरोज शेख यांनी २ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १२ वाजता १०८ रुग्णवाहिकेला कॉल करुन नवजात बालकाला उपचारासाठी औरंगाबाद येथे घेवून जायचे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी अर्ध्यातासात रुग्णवाहिका येईल असे सांगितले होते. वास्तविक त्यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असतांना त्या बालकाच्या नातेवाईकांना औरंगाबाद येथे बेड उपलब्ध आहे का याची खात्री करा तरच आम्ही बालकाला औरंगाबाद घेवून जाऊ असे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री ८.३० वाजता बेड उपलब्ध असल्याची खात्री बालकाच्या नातेवाईकांनी दिल्यानंतर देखील दीड ते दोन तास दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी त्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर, जिल्हा व्यवस्थापक यांच्यासह संबधित लोकांना नोटीसा बजाविल्या असून दिरंगाई करणाऱ्या संबधित डॉक्टराला काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
* डॉ. देशमुख दोन्ही ठिकाणी कार्यरत
डॉ. उमर देशमुख हे म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गंत वडली उपकेंद्रात सीएचओ म्हणून गेल्या सहा ते सात महिन्यापासून कार्यरत आहेत. तसेच ते जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १०८ रुग्णवाहिकेवर देखील कार्यरत आहेत.







