नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ;- कोविशिल्ड लस घेतलेले नागरिक युरोपमधील देशांचा प्रवास करू शकतील. युरोपियन युनियनचा भाग असलेल्या जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड आणि स्पेन या सात देशांनी तसेच स्वित्झर्लंड या देशाने कोविशिल्ड लसला मान्यता दिली. यामुळे कोविशिल्ड लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, व्हिसा, पासपोर्ट आदी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रवास करू शकतील.
याआधी युरोपिनय युनियनने भारतात कोविशिल्ड लसचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली नव्हती. यामुळे भारतातून युरोपमध्ये जाणे कठीण झाले होते. भारतीय नागरिक असलेल्या पण शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय या निमित्ताने युरोपमधील देशात राहणाऱ्या आणि सध्या मायदेशात असलेल्या नागरिकांची पंचाईत झाली होती. मात्र हा प्रश्न आता सुटला आहे.
भारतीय लस प्रमाणपत्राला ग्राह्य धरले नाही तर युरोपियन युनियनच्या लस घेतल्याच्या प्रमाणापत्राला भारत स्वीकारणार नाही, असा पवित्रा भारताने घेतला. यानंतर भानावर आलेल्या युरोपियन युनियनमधील सात देशांनी भारताच्या कोविशिल्ड लसच्या प्रमाणपत्राला ग्राह्य धरणार असल्याचे जाहीर केले. लवकरच कोवॅक्सिन लसच्या प्रमाणपत्रालाही युरोपियन युनियनमधील देशांकडून ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे.