पारोळा -(प्रतिनिधी) ;- चहुत्रे हा दुष्काळ ग्रस्त असून येथील पाण्याचा प्रश्न गावकऱ्यांना नित्याचाच झाला आहे. आज २३ रोजी बीडीओ एन. आर. पाटील यांनी गावात भेट देत पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
चहुत्रे येथे पाणी प्रश्न हा गंभीर असून गावात नळांना पाणी महिनो महिने येत नाही. नागरिकांना, महिला, मुलं मुलींना पाणी हे दूरदूरच्या शेतांमधल्या विहिरींमधून आणावं लागत तर पिण्याचं पाणी विकत घ्यावे लागते. या विषयी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती आणि भीम आर्मी सामाजिक संघटने लगातार पंधरा दिवसापासून आवाज उठविला असून प्रशासनाने त्याची दखल घेत आज बीडीओ एन आर पाटील, यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, विभागीय अध्यक्ष – जितेंद्र एम वानखेडे , महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील भीम आर्मी चे भाऊसाहेब सोनवणे यांनी चहुत्रे गावाला भेट दिली.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेत बीडीओ साहेबांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून धारागिर धरण येथे विहीर मंजूर करून तेथून पाईप लाईन आणि बाहूटे धरणाच्या जवळील विहरीचे पाणी गावात उपलब्ध करून गावातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्या ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते त्यात महिलांची उपस्थिती अधिक असल्याचे पाहायला मिळाले . पोलीस प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .