पहूर , ता जामनेर ;- पहूर चिलगाव रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकला दिलेल्या धडकेत १ जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची दुर्घटना आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सांगवी गावाजवळील पूलानजीक घडली . या अपघातात एका बकरीचाही मृत्यू झाला असून दोन बकऱ्या जखमी झाले आहेत .
पहूर येथून दोन किमी अंतरावर असलेल्या सांगवी गावाजवळ उभारण्यात आलेल्या चुकीच्या पुलामुळे समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने ( एम एच १९ /३१५३ ) पहूर कडून चिलगावकडे जाणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली .यात मोटर सायकलस्वार निवृत्ती उखर्डू सुतार ( वय ५० ) रा. चिलगांव यांचा जागीच मृत्यू झाला .
मयत निवृत्ती सुतार हे कापुसवाडी (ता. जामनेर ) येथून त्यांच्या बहिणीला भेटून आपल्या मोठ्या भावासह मोटरसायकलने ( क्र . एम . एच .१९ बी. के . ४८८७ ) चिलगांवकडे जात असताना समोरून पहूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्याचे मोठे भाऊ वामन उखर्डू सुतार (वय ५५ ) रा. चिलगांव यांच्यासह रस्त्याच्या कडेला बकऱ्या चारणाऱ्या जामराबाई बाबु तडवी , रा सांगवी या जखमी झाल्या असून त्या चारत असणाऱ्या बकरं पैकी एक बकरी जागीच ठार झाली तर दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत . जखमींना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल आले . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले . घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक घटनास्थळी दाखल झाले . या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत . मयत निवृत्ती उखर्डू सुतार यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला .
दरम्यान पहूर – चिलगांव मार्गावर सांगवी जवळ नाल्यावर बांधण्यात आलेल्या चुकीच्या पुलांमुळे सदर दुर्घटना घडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पुलाची उभारणी करून शेतकर्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने पुल उभारला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे .या पुलामुळे दोन वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते .