शिवकॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील शिवकॉलनीजवळील हॉटेल चिनार गार्डन समोर आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ग्राहक बोलविल्याच्या कारणावरून दोन चिकन व्यावसायिकांनी एकमेकांवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव चिकन सेंटरचे सद्दाम खाटीक आणि लालू चिकन सेंटरचे इम्रान खाटीक या दोघांमध्ये ग्राहक बोलविण्याचा वाद उफाळून आल्याने दोघांनी एकमेकांवर चाल करून कोयत्याने वार केल्याची घटना घडली . यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे . घटनेत सद्दाम खाटीकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे तर इम्रान खाटीकच्या हाताला दुखापत झाली आहे. दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले.