मुंबई (वृत्तसंस्था) – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अशातच आज मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी आमदार फंडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून राज्यातील आमदारांना आता स्थानिक विकास निधीचा वापर कोरोना प्रतिबंधात्मक वैद्यकीय सामग्री विकत घेण्यासाठी करता येणार आहे. सरकारने याबाबत काढलेल्या अध्यादेशामध्ये आमदार आपला फंड इन्फ्रारेड थर्मामीटर, वैयक्तिक संरक्षण उपकरणे किट, कोविड १९ चाचणी किट, आयसीयू व्हेंटिलेटर, फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर या गोष्टींची खरेदी करून मतदार संघातील कोरोना रुग्णांसाठी विलगता गृह उभारू शकतात. दरम्यान, देशभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या ७४४७ वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनला असून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारी सूचनांचे पालन करणे अभिप्रेत आहे.








