जळगाव;- गेल्या चार वर्षांपासून रखडलेला जळगाव शहर महानगरपालिका कर्मचार्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने यासंदर्भात मंगळवारी (8 जून 2021) आदेश जारी केला. गेल्याच आठवड्यात महापौर सौ.जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी यांनी मुंबईला जाऊन यासंदर्भात नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी करीत निवेदनही दिले होते. त्यानंतर केवळ आठवडाभरात शासनाने हा निर्णय जाहीर केल्यामुळे महापालिका कर्मचार्यांत आनंदाचे वातावरण असून, त्यांना हा मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग शासनाने लागू करावा, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. मात्र, महापौर सौ.जयश्री सुनील महाजन यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच भाग म्हणून आज बुधवार, दि. 9 जून 2021 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास महापालिकेच्या सफाई कामगार युनियनतर्फे अध्यक्ष .अजय घेंगट यांच्या नेतृत्वात महापालिका कर्मचारी अनुक्रमे .अर्जुन पवार, किरण चव्हाण, दीपक तांबोळी, नासीर भिस्ती, कुंदन तांबोळी, लखन गोंडाळे, विकास केदार आदींनी महापौर .जयश्री महाजन यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले.







