जळगाव(प्रतिनिधी) ;– येथील गांधी रिसर्च फाऊण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैनयांच्या संकल्पनेतून जैन हिल्स येथे साकारलेले गांधीतीर्थ म्युझियम पर्यटक व गांधी विचार अभ्यासकांसाठी मंगळवार दि. ८ जून पासून खुले करण्यात येत आहे. ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आली. मार्च २०२० वर्षांपासून कोरोना आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ‘कोरोना’चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्युझियम बंद ठेऊन खबरदारी घेतली होती. या म्युझियमची लोकप्रियता इतकी आहे की आतापर्यंत 5 लाखांहून अधिक देश-विदेशातील प्रेक्षकांनी गांधी तीर्थ स्थळास भेट दिली आहे.
शासन आदेश व सर्वत्र लॉकडाऊन असल्याकारणाने गेल्या मार्च २०२० पासून हे म्युझियम खरबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आले होते. जैन हिल्स येथील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या स्वच्छ व नियमांचे काटेकोर पालन येथे केले जाते. ही बाब ध्यानात घेता कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील गांधी विचारांचे प्रेरणास्त्रोत असलेले गांधीतीर्थ खुले ठेवावे असे मत अनेक पर्यटकांनी कळविले होते. मात्र शासनाच्या नियमानुसार गांधीतीर्थ बंद ठेवण्यात आले होते. आता काेराेनाच्या संसर्ग परिस्थितीमुळे जिल्ह्यात लावण्यात आलेले विशेष निर्बंध ७ जून २०२१ पासून पुढील आदेश येईपर्यंत हटवण्यात आले आहेत. शासनाने अनलॉकबाबतचे आदेश ४ जून रोजी काढले आहेतच.
शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन ‘गांधीतीर्थ’ म्युझियम ८ जून पासून सुरू करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टिने सर्व प्रकारचे प्रावधान करण्यात आले आहे. राज्य सरकार द्वारे देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व नियमावली अंमलात आणून भेटी देणाऱ्या पर्यटकांची आरोग्य तपासणी करून प्रवेश दिला जाईल. गांधीतीर्थ पुनश्च खुले होणे हे पर्यटकांसाठी सुवर्ण संधीच म्हणायला हवी. म्युझियम बंदच्या काळात म्युझियममध्ये अनेक तांत्रिक सुधारणा केलेल्या आहेत. पूर्वीपेक्षा गॅलरीत अनेक चांगले बदल करण्यात आले आहेत. म्युझियममध्ये अजून इतर नाविन्यता बघायला मिळणार आहे हे विशेष.
ईच्छुकांनी गांधीतीर्थला भेट देण्यासाठी बुकिंग केल्यास सोयीचे होईल. त्याकरीता खालील नंबरवर संपर्क साधावे अशी माहिती गांधीतीर्थच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. गांधीतीर्थ म्युझियम, जैन हिल्स, जळगाव. संपर्क – 9404955300 / 0257-2264803
खबरदारीच्या खालील उपाययोजना – निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाची आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता खालील उपाययोजना कटाक्षाने करण्यात आलेल्या आहेत. 1) सोशल डिस्टन्सिंगसह ऑडिओ गाईडेज टूर, 2) थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सीमीटर द्वारे तपासणी, 3) गरजेनुसार ठराविक ठिकाणी सॅनिटायझेनची व्यवस्था, 4) खादीचे मास्क विक्रीस उपलब्ध, 5) कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध आहे.