एलसीबीची कारवाई ; जिल्ह्यातील १५ गुन्हे उघड ,२४ दुचाकी जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- एका २० वर्षीय तरुणाने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले आहे.गणेश उर्फ ‘गुंठ्या ‘भल्या पावरा वय २० रा. बोरमळी ता. चोपडा असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २४ दुचाकी हस्तगत केल्या असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल १५ गुन्हे त्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संशयित गुंठ्या हा आरोपी जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जावून दुचाकींची चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, श्रीकृष्ण पटवर्धन, अश्रम शेख, सुनिल दामोदरे, प्रदीप पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दिपक शिंदे, मुरलीधर बारी, वसंत लिंगायत आणि उमेशगीरी गोसावी यांनी सापळा रचला. आज दुपारी संशयित आरोपीला बोरमळी गावाच्या बाहेर जंगलात असतांना अटक केली.त्याने चोरीच्या २४ दुचाकी काढून दिल्या. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.