जळगाव (प्रतिनिधी) – ज्याप्रमाणे रामराज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात सर्वधर्मसमभाव होते. याच संकल्पनेवर आधारित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली तर कोणावरही अन्याय होणार नाही. हिंदू राष्ट्रच सर्वकल्याणकारी राष्ट्र ठरेल. २०२३ पर्यंत भारतात हिंदू राष्ट्राची निर्मिती झालेली दिसेल असा विश्वास हिंदू राष्ट्र जनजागृती सभेत वक्त्यांनी दिला. शहरातील शिवतीर्थ मैदानावर हिंदू जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेला लष्कर-ए-हिंदचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सनातनचे धर्मप्रसारक नंदकुमार जाधव, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.विरेंद्र इचलकरंजीकर आदी वक्त्यांनी संबोधित केले. हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांनी एकजूट होण्याचे आवाहन या सभेत करण्यात आले. केवळ हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हे संकुचित ध्येय न ठेवता ‘कृण्वतो विश्वम आर्यम्’ म्हणजे अखिल विश्व सुसंस्कृत करू, अशी आपल्या पूर्वजांची घोषणा होती. ही घोषणा सार्थ करण्याचे धर्मकर्तव्य आपण सर्वजण पार पाडूया. यासाठी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. धनुर्धारी अर्जुनाचा प्रत्येक बाण लक्ष्यवेध करायचा; कारण तो सतत श्रीकृष्णाचा जप करायचा. नामजपामुळेच धर्मरक्षराच्या कार्यासाठी आत्मबळ मिळणार आहे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव यांनी केले.
देशाच्या राज्यघटनेत बहुमताला स्थान असले, तरी बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान मिळत आहे. कायद्याचा गैरवापर केला जातो. यामुळेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना न्याय मिळवून देण्याकरिता कायद्याची योग्य ती माहिती आणि वापर आवश्यक आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मागे अधिवक्त्यांचे बळ असेल, तर कार्य करणे सोपे होते. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.विरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.
देशभरात सध्याचे वातावरण पाहता सभेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी चौकशी केल्याशिवाय प्रवेश दिले जात नव्हते. बॉम्ब शोध पथक देखील तैनात होते. पोलीस प्रशासनाने संपूर्ण सभेचे चित्रीकरण केले.महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता यापासून स्वत:चे रक्षण कसे करावे? यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून दाखवली. महिला, महाविद्यालयीन तरुणीचे छेड काढणाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे?, गुंडांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे?, हल्ला झाल्यास त्याला कसे परतवावे याबाबतचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.