मुंबई (वृत्तसंस्था) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सोमवारी (दि.31) जयंती आहे. या दिवशी चौंडी या त्यांच्या जन्मगावापासून पुन्हा एकदा आरक्षणाचा जागर करणार आहोत. त्यातून महाविकास आघाडी सरकारला समाजाची ताकद दाखविणार आहोत, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. चौंडी येथे जाऊन अभिवादन करणार आहेत. त्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केले जाणार आहे. यावेळी समाजबांधवांनी घरातच थांबून समाजाची वेशभूषा परिधान करून जयंती साजरी करावी असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. आमदार पडळकर
यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 2017-18 राज्यभर लढा उभारला होता. समाजाचे अनेक लक्षवेधी मेळावे घेऊन त्यांनी जनजागृती केली होती.

आमदार पडळकर म्हणाले, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धनगड आणि धनगर समाज एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारने तरतूद केलेल्या 1 हजार कोटी रुपयांपैकी एक रुपयाही निधी समाजासाठी खर्च केला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही धनगर आरक्षणाचा जागर करणार असल्याचे ते म्हणाले.







