पुणे (वृत्तसंस्था) – करोना विषाणूमुळे देशात वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे परंपरागत ब्रोकिंग व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच निर्देशांक कोसळल्यामुळे गुंतवणुकीच्या बऱ्याच संधी गुंतवणूकदारांना खुणावत आहेत. त्यामुळे ऑनलाइन ब्रोकरेज कंपन्यांच्या उलाढालीत चांगलीच वाढ होऊ लागली आहे.अप स्टॉक, फाईव पैसे डॉट कॉम, अँजेल ब्रोकिंग या कंपन्यांच्या उलाढालीत लॉकडाऊन काळात बरीच वाढ झाली आहे. मार्चमध्ये या कंपन्यांकडे नव्या खात्याची बऱ्याच प्रमाणात विचारणा झाली. त्याचबरोबर जुन्या खातेदारांकडून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले, असे ‘फाईव्ह पैसे डॉट कॉम’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गगदानी यांनी सांगितले.ते म्हणाले, सध्याच्या काळात फोनवरील संपर्कात अडथळे येत असले तरी आमच्या ग्राहकांकडून ई-मेलवर आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत. त्यामुळे आमचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होत आहे. याबाबत ‘अँजेल ब्रोकिंग’चे वरिष्ठ अधिकारी प्रभाकर तिवारी म्हणाले, परंपरागत ब्रोकिंग पद्धतीपेक्षा आमच्या डिजिटल ब्रोकिंगच्या माध्यमातून व्यवहार करणे ग्राहकांना अधिक सोपे झाले आहे. आम्हाला मार्चमध्ये 1 लाख नवे ग्राहक मिळाले आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच ग्राहक छोट्या शहरातील आहेत, असे त्यांनी सांगितले. एका दिवसात या काळात 20 लाख व्यवहार झाले असल्याचा दावा त्यांनी केला. मार्चमध्ये लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता होती. त्याचबरोबर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्यामुळे काही गुंतवणूकदार सध्याच्या निर्देशांकाच्या कमी पातळीवर शेअर बाजारांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.