महापौर, उपमहापौरांकडून सांडपाणी निचर्यासह स्वच्छतेचे आदेश
जळगाव;- येथील प्रभाग क्र. 15 व 18 या दाट लोकवस्ती असलेल्या देशमुखनगर, इक्बाल कॉलनी व मलिकनगर लगत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील रिलायन्स पेट्रोलपंपानजीकच्या पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना सुरवात पोकलँडच्या सहाय्याने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या नाल्यासह मेहरुणमधील महादेव मंदिराजवळील तसेच श्रद्धा कॉलनी परिसरातील नाला सफाईचे काम होणार असून, येत्या चार-पाच दिवसांत ते पूर्णत्वास येईल.
या प्रभागाचे नेतृत्व महापौर जयश्री महाजन व प्रशांत नाईक करतात. महापालिका आरोग्य विभागांतर्गत प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण, बांधकाम अभियंता श्री. मराठे, प्रभाग समिती अधीक्षक श्री.धांडे, एस. बी. बडगुजर, आरोग्य निरीक्षक हेमंत ढंढोरे, मक्तेदार रईस शेख, अल्ताफ शेख, इक्बाल काझी यासह कर्मचारी व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की महापालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाईसह तेथील झाडेझुडपे काढून ते प्रवाही करण्याचे काम हाती घेतले जाते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहरातील चारही प्रभाग अधिकार्यांसमवेत शहरातील लहान-मोठे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात या कामांसाठी लागणार्या पोकलँडसंदर्भात निविदा काढण्यावर चर्चा झाली. त्या अनुषंगाने निविदा काढण्याचे काम सुरू असून, ज्या प्रभागांसाठी मक्तेदारांनी कामे घेतली आहेत त्यांनी ती सुरू केली आहेत. त्याचाच भाग म्हणून लहान नाले सफाईचे काम सुरू झाले असून, आठ-दहा दिवसांत ते पूर्णत्वास येईल. आज आपण मेहरुण तलावातील सांडवा तसेच देशमुखनगर, इक्बाल कॉलनी व मलिकनगर भागातील गटारींचे पाणी ज्या नाल्यात जाऊन मिळते त्या महामार्गावरील मोठ्या पुलाखालील, मेहरुणमधील महादेव मंदिरानजीकचा तसेच श्रद्धा कॉलनी परिसरातील नाला सफाईच्या कामांना सुरवात करीत आहोत. यामध्ये संबंधित नालेसफाईसह त्यातील गाळ, प्लास्टिक पिशव्या, कचरा, झाडेझुडपे काढून ते प्रवाही केले जातील. ही कामे चार-पाच दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर संबंधित नाल्यांत डास, मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके टाकून फवारणीही केली जाईल.
महापौर जयश्री महाजन यांनी याप्रसंगी परिसरात ठिकठिकाणी दिसून आलेल्या अस्वच्छतेबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांच्याशी चर्चा करून स्वच्छतेचे आदेश दिले. तसेच नाल्याकाठच्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आस्थेवाईकपणे चौकशी करीत पावसाळ्याच्या काळात काळजी घेण्याचे सांगितले. तसेच स्वच्छतेसंदर्भात काहीही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संपर्काचे आवाहन केले.