मेरठ(वृत्तसंस्था ) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. शहरात राहणाऱ्या ग्रेगरी रेमंड राफेल यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना कोरोनामुळे एकाच वेळी गमावलं आहे. कुटुंबातील २ मुलांच्या अचानक जाण्याने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैव म्हणजे या दोघांचा जन्म एकत्र झाला होता आणि मृत्यूही एकाच दिवशी झाला. अलीकडेच दोघांनी २४ वा बर्थ डे साजरा केला होता.
या दोघांचे नाव जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी असं आहे. हे दोघंही एकत्र कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते. हैदराबादमधील एकाच कंपनीत दोघं नोकरीला होते. वडील रेमंड यांनी सांगितले की, माझ्या मुलांना २४ एप्रिलला खूप ताप आला. कोरोना संक्रमित झाल्यामुळे दोघांचा मागच्या आठवड्यात १३ आणि १४ मे रोजी मृत्यू झाला. जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी यांचा जन्म २३ एप्रिल १९९७ मध्ये झाला होता.