जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पिंप्रीहाट (ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेला आणि सध्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. शनिवारी (दि. 15) सकाळी आखतवाडे शिवारात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
प्रमोद दिनकर पाटील ( 26) या जवानाचे नाव आहे. नाशिकमधील देवळाली येथील आर्मी ट्रेनिंग मध्ये पी.टी.मास्तर म्हणून ते नुकतेच रुजू झाले होते. चार महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पाटील हे नुकतेच गावी सुट्टीवर आले होते. मात्र आज सकाळी आखतवाडे शिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. पाटील यांची आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.