नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामुळे सर्व सामान्यांपासून अगदी सिनेसृष्टीतील दिग्गज असे सारेच चिंतेत आहेत. सर्वत्र भितीचे वातावरण आहे. अशातच अनेकांच्या निधनाच्या अफवांना जोर चढला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर जोरदार पसरत आहेत. आता ‘शक्तीमान’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या जात आहेत. मात्र यावर आत्ता मुकेश खन्ना खूपच संतापले आहेत. दरम्यान त्यांनी या अफवांना रोख लावत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्यांनी अफवा पसरवणाऱ्या लोकांना पकडून मारले पाहिजे असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘शक्तिमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या अफवांना चांगलाच जोर आला आहे. मात्र या अफवांवर आता खुद्द मुकेश खन्ना यांनीच उत्तर दिलं आहे. ‘मी खरंच आता वैतागलो आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय मिळतं? जवळपास माझ्या सर्व मित्रांनी आणि कुटुंबीयांनी मला फोन करून तब्येतीची विचारपूस केली,’ अशा शब्दांत त्यांनी स्वतःचा संताप व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत आपल्या चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. सोबतच ‘माझी तब्येत ठीक आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांना पकडून मारलं पाहिजे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी एकदम ठणठणीत आहे,’ असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अभिनेता मुकेश खन्ना याना आजही लोक शक्तिमान या भूमिकेमुळे प्रचंड प्रेम करतात. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध वयोगटातील प्रत्येक व्यक्ती त्यांना शक्तिमान म्हणून ओळखते. त्यांचे फॅन फोईलोइंग देखील जबरदस्त आहे. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांत अव्वल दर्जाच्या भूमिका निभावल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिने सृष्टीपासून दुरावलेले मुकेश स्वतःच्याच निधनाच्या अफवांमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. याआधी अभिनेत्री किरण खेर यांच्याही निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांचे खंडन त्यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे केले होते.