जळगाव : – महापालिकेची आज ऑनलाईन महासभा पार पडली . या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊन वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावरून भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये चांगलीच ‘तू तू -मै मै !’ झाली. शिवसेनेने हे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजुर केले. मात्र, महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले? असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला.
महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा पार पडली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले.
त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमतांवर मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला
हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा वाद मिटला.