मुंबई (वृत्तसंस्था) – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. 5) पार पडली. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये मराठा समाजातील युवावर्गाला काय मदत करता येईल, याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असे आमदार पवार यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर चांगले झाले असते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. या न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे. पूर्वीच्या सरकारने जे विधीतज्ञ नेमलेले होते, तेच विधीतज्ञ याही सरकारने कायम ठेवले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी याबाबत कुठल्या प्रकारचे राजकारण करत बसू नये.
मराठा समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक, उद्योग यासह विविध क्षेत्रात काय मदत करता येईल, याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी बसून निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा या समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची राजकीय शक्ती नाही. तो एक समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.