मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षण संदर्भातला निकाल आज न्यायालयानं जाहीर केला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता राज्य सरकारने सुपरन्यूमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात’ असं संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
याबाबत कोल्हापुरात प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे आता काहितरी मार्ग काढणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्रित प्रयत्न करण्याची गरज नाही. तूर्तास मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी सुपरन्यूमररी हा एकमेव पर्याय दिसतो आहे. त्यासाठी राज्य सरकारला कोणाच्याही परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने सुपरन्यूमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात असं संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
सध्याची कोविड परिस्थिती बघता संभाजीराजे यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जिवंत राहिले पाहिजे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.