शिवसेनेची पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार टीका
जळगाव (प्रतिनिधी) ;- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर भाजपाने पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप तथ्यहीन आहेत. महानगरपालिका कर्जमुक्त केली असे भाजपा सांगते. पण आजही दरमहा तीन कोटी रुपये हफ्ता महापालिकेला का भरावा लागत आहे ? आ. गिरीश महाजन पालकमंत्री होते तेव्हा महापालिकेसाठी निधी का आणता आला नाही ? असे प्रश्न उपस्थित शिवसेनेने उपस्थित केले आहेत. शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. याप्रसंगी बंटी जोशी, शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन , महानगराध्यक्ष शरद तायडे ,प्रशांत नाईक, गणेश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
१२५ कोटी रुपये महापालिकेत निधी आला होता तेव्हा भाजप-शिवसेनेचे सरकार होते. भारतीय जनता पार्टीचा महापौर नवीन आला, त्यावेळेस भाजप- शिवसेनेचे सरकार सत्तेत होते. त्यावेळेस भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि शेवटी आ. गिरीश महाजन पालकमंत्री होते त्या वेळेस भाजपला ठराव करून निधी आणता आला नाही. त्या वेळेस भाजपला कोणी थांबवलं होते ? तेव्हादेखील जळगाव शहराला विकासासाठी निधीची अत्यंत गरज होती. मात्र तेव्हा भाजपने कुठलेही स्वारस्य दाखविले नाही.
भाजपने वारंवार छाती फुगवत सांगितले की, आम्ही जळगाव शहर महानगरपालिका कर्जमुक्ती केली. कर्जमुक्ती झाली असेल तर मग आजही महानगरपालिका तीन कोटी रुपये हप्ता भरत आहे, तो कशासाठी ? उलट भाजपमुळे सरकारचे व महानगरपालिकेचे नुकसान झाले. जेव्हा केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार होते, तुम्ही कर्जमुक्ती करायला पाहिजे होती, सेटलमेंट नाही असा घणाघात शिवसेनेने केला.
चांगल्या कामाचे कौतुक शिवसेना नेहमी करीत आली आहे. म्हणून पक्षादेशाची वाट न पाहता भाजपच्या मागील महापौरांचा जाहीर सत्कार केला
. शिवसेनेला भाजपासारखी नौटंकी जमत नाही, असे शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक म्हणाले.
भाजपच्या आमदार, खासदारांनी त्यांच्या निधीतून जळगाव शहरासाठी किती निधी दिला ? जनतेने तुम्हाला निवडून दिले मात्र जनतेला तुम्ही दिले काय ? राज्यात सत्ता तुमची आहे, निधी आणा अशी सभागृहात भाजपा मागणी करीत होती. आता ६१ कोटींचा निधी शिवसेनेने शहराच्या विकासासाठी आणला तरीही तुम्हाला टीका सुचते म्हणजे तुमचे खुजेपण लक्षात येते अशी खरमरीत टीकादेखील शिवसेनेने पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेचे हुडकोचे कर्ज डी आर टी कोर्टात फक्त 68 कोटी रुपयांमध्ये होणार होते. पण शहराच्या आमदारांनी यात राजकारण आणलं आणि फक्त श्रेय घेण्यासाठी वकिलांच्या पॅनलला कोर्टात जाऊ दिलं गेलं नाही. शेवटी हे 68 कोटी रुपयांचे कर्ज अखेर अडीचशे कोटी रुपयांपर्यंत गेले. यानंतर असे दाखवण्याचा प्रयत्न झाला की सव्वाशे कोटी राज्य सरकारने दिले आणि सव्वाशे कोटी रुपयांमध्ये जळगाव महापालिकेला दरमहा तीन कोटी भरून देण्यात आले. मात्र हे सर्व खोटं आणि लोकांची दिशाभूल करण्याचा खेळ भाजपने गेल्या अडीच वर्षात खेळला आहे. तो आता तरी त्यांनी थांबवावा आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप करणे थांबवावे, असेही प्रत्युत्तर सेनेने दिले.
भाजपाची अवस्था ही केविलवाणी आहे. महापालिकेची परिस्थिती नसताना गिरीश महाजन यांनी महापालिका कर्ज मुक्त केली. शिवाजीनगरचा पूल बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी शासनाकडून गिरीश महाजन यांनी निधी मंजूर करुन आणला, अशा वल्गना भाजप कडून होत आहेत आता या सर्व गोष्टी वारंवार सांगून झालेल्या आहे. भाजपला जळगावकर नागरिकांनी एक हाती सत्ता दिली. आमदार व खासदार ही भाजपचे निवडून दिले .तरीसुद्धा तुमचे रडगाणे सुरूच आहे. भाजपची अवस्था तमाशा सारखी झाली आहे. भाजपने फक्त तीन पैशांचा तमाशा मांडला आहे. नाचता येईना, अंगण वाकडे अशी स्थिती भाजपची असून हा तमाशा त्यांनी थांबवावा असे आवाहन शिवसेना करीत आहे.