नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात सध्या करोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात पकडून पुढे गेलं पाहिजे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे.
सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे हे आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती मानवतेला हादरवणारी आहे, हे मला माहीत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. तर काही ठिकाणी आयसीयू बेड्सची टंचाई आहे. ही परीक्षेची वेळ आहे. एकमेकांना मदत करा. आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हंटल.
तर, ‘ केंद्र व राज्य सरकारांसाठी ही वेळ जागे होण्याची व कर्तव्य निभवण्याची आहे. माझा केंद्र सरकारकडे आग्रह आहे, त्यांनी सर्वात अगोदर गरिबांचा विचार करावा व त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात संकट संपेपर्यंत ६ हजार रुपये जमा करावेत. देशात करोना चाचण्या वाढवल्या जाव्यात, औषधी, ऑक्सजन व रूग्णालयांचा युद्धपातळीवर प्रबंध केला जावा. सर्व देशवासियांचे करोनापासून बचावसाठी मोफत लसीकरण व्हावे, जेणेकरून लोकांना वाचवलं जाऊ शकेल.







