मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देश पुढे येत आहेत. यात असाही एक देश आहे ज्याने आपल्या उदारतेचे उदाहरण जगातील अनेक महाशक्तिशाली देशांसमोर आदर्श म्हणून ठेवले आहे. भारतानेही अनेक वेळा या देशाला आर्थिक मदत आणि सामान पाठवून मदत केली आहे. नुकत्याच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या मदतीने तिथे तयार झालेल्या मेट्रो सेवेचे उद्घाटन केले होते.

मॉरिशिअस या छोट्याशा देशाने भारताला 200 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर्स पाठवले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अमूल्य भेटीबद्दल मॉरिशिअस सरकारचे आभार मानले आहेत. मॉरिशिअससोबतची भारताची मैत्री यासाठीही खास आहे की या देशावर चीनचाही खूप दबाव कायम आहे. तरीही मॉरिशिअसने भारतासोबतच्या आपल्या मैत्रीला पहिले प्राधान्य दिले आहे.
मॉरिशिअस हा हिंद महासागरात रणनैतिकदृष्ट्या खूप महत्वाच्या ठिकाणी वसलेला आहे. या भागातून दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होतो. आफ्रिकेच्या बेटांच्या जवळ हा देश असल्याने या देशातून हिंद महासागराच्या एका खूप मोठ्या भागावर नजर ठेवता येते. या देशाजवळ रेयूनियो बेटे आहेत ज्यांच्यावर फ्रान्सचा कब्जा आहे. इथे फ्रान्सचा लष्करी तळ आहे. मॉरिशिअसच्या ईशान्येला डिएगो गार्सिया आहे जिथे अमेरिकेचे आणि इंग्लंडचे लष्करी तळ आहेत.
भारत आणि मॉरिशिअसचे गाढ नाते याच गोष्टीवरून समोर येते की हा देश आपला राष्ट्रीय दिवस गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या स्मरणार्थ म्हणजेच 12 मार्च रोजी साजरा करतो. मॉरिशिअसचा विश्वास आहे की याच मिठाच्या सत्याग्रहापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 1968 साली इंग्रजी अधिपत्यापासून स्वातंत्र्य मिळवले. भारतासोबत मुक्त व्यापार करार, ब्लू ओशन अर्थव्यवस्था, सागरी सुरक्षा, अँटी पायरसी ऑपरेशन अशा अनेक महत्वाच्या मोहिमांमध्ये मॉरिशिअसने भारताला साथ दिली आहे.







