मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. त्यातच राज्यात विविध किंमतीना रेमडेसिवीर विकत घेण्याची ऑर्डर काढली आहे. मात्र रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या किंमतीत तफावत असल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटले आहे. याबाबत सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याचिका दाखल केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एप्रिल 2021 मध्ये मुंबई महापालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शन 1568 रुपयांना खरेदी करण्याची ऑर्डर काढली, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने 1311 रुपये, हाफकिन इन्स्टिट्यूटने 665.84 तर मीराभाईंदर महापालिकेने 665.84 रुपयांना विकत घेण्याची आर्डर काढली. या खरेदीच्या किंमतीत इतकी तफावत असल्याने यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याबाबत याचिका लोकायुक्त आणि एसीबीकडे दाखल केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यात कोट्यवधीचा ऑक्सिजन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. ऑक्सिजन घोटाळ्याबाबत लवकरच काळी पत्रिका प्रसिद्ध करुन, राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता.







