मुंबई (वृत्तसंस्था ) ;- देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना या संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचा मुंबईत आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे. यातच आता मुंबईकरांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार मुंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढली, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये याउलट चित्र पाहायला मिळत आहे.

उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या विषाणूची लागण झाल्याचे दिसत होते. त्यानंतर आता याच उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे. तर, याउलट चित्र झोपडपट्टी भागात दिसत आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा निष्कर्ष तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे. 24 विभागांमधील 10 हजार 197 नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात झाली. त्यात 36.30 टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष आहे. असे असले तरीही कोरोनाबाबतची सावधगिरी काटेकोरपणे बाळगली जाणे अपेक्षित आहे.







