मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईतील विरार येथील घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. विरारच्या घटना हि अत्यंत वाईट आहे. या घटनेतील मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटलं. त्यानंतर टोपे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे, असं स्पष्टीकरण दिला.
डॉ. टोपे म्हणाले, ‘माझ्यावर आलेल्या अतिदुःखाच्या प्रसंगात देखील मी माझं कर्तव्य व जबाबदारीला नेहमीच महत्व दिलेलं आहे. मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मनात जे विचार असतात, ते नेहमी सामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी मी संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत आलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं माध्यमांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे.
डॉ. टोपे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात आता ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी व त्यात गती वाढविण्यासाठी आता एअरफोर्सचेही सहकार्य घेतले जाणार आहे. वास्तविक पाहता ऑक्सिजन इतर राज्यातून आपल्या राज्यात येण्यासाठी उशीर होत आहे. सध्या विशाखा पट्टणम येथून रेल्वे येत आहे. परंतु त्यास उशीर झाला आहे. ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जातील. एअरफोर्सच्या माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जातील.