नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. अशात आपल्याला घाबरण्याची किती गरज आहे किंवा किती नाही, यावर भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एल्ला यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करत सांगितलं, की ही लस केवळ तुमच्या खालच्या फुफ्फुसांचे संरक्षण करते, वरच्या फुफ्फुसांचे नाही. त्यामुळे, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होणार नाही, असा दावा करता येणार नाही.

त्यांनी पुढे म्हटलं, की सर्वच इंजेक्शनच्या रुपात असणाऱ्या लसींची ही समस्या आहे. ते पुढे असंही म्हणाले, की ही लस गंभीर होण्यापासून वाचवते. या लसीकरणानंतर कोरोना झाला तरीही यामुळे जीव जाणार नाही. त्यांनी सांगितलं, की लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करावा लागेल आणि कोरोना नियमांचं पालनही करावं लागेल. येत्या 1 मेपासून लसीकरण मोहिम आणखीच वेगानं होणार आहे, यात 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल.
देशातील लसीकरण मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात म्हणजेच मेमध्ये कोव्हॅक्सिनच्या तीन कोटी डोसची निर्मिती करणार आहे. कृष्णा एल्ला यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. मार्च महिन्यात कंपनीनं लसीच्या 1.5 डोसचं उत्पादन केलं होतं. एल्ला यांनी सांगितलं, की वर्षाला ते लसीच्या 70 कोटी डोसची निर्मिती करणार आहेत.
कमीत कमी वेळात सर्व भारतीयांचं लसीकरण करता यावं यासाठी पंतप्रधानांनी लसीचं उत्पादन वाढवण्याचं आवाहन कंपन्यांना केलं होतं. यानंतर एल्ला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मागील महिन्यात आम्ही दीड कोटी लसीच्या डोसचं उत्पादन केलं होतं. यावेळी आम्ही दोन कोटी डोसची निर्मिती करणार आहोत, असंही एल्ला म्हणाले. तर, त्याच्या पुढच्या महिन्यात तीन कोटी डोसची निर्मिती केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर उत्पादनात सातत्यानं वाढ केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.







