पिंपरी ;- अवघ्या सहाशे रुपयांत कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून रिपोर्ट तयार करण्यासाठी लागणारे बनावट शिक्के, लेटर हेड, रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. वाकड येथे ही कारवाई करण्यात आली.
पत्ताराम केसारामजी देवासी (३३, रा. भगवाननगर, भूमकर चौक, वाकड) आणि राकेशकुमार बस्तीराम बेष्णव (२५, रा. धनकवडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचे अन्य साथीदार फरार झाले आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकड येथील शनी मंदिराजवळ बनावट कोरोना रिपोर्ट देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे दोघे आणि त्यांचे साथीदार बनावट कोरोना रिपोर्ट देत असल्याचे समोर आले. आरोपींकडून बावधन येथील लाईफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लॅबच्या नावाचे बनावट रिपोर्ट, लेटरहेड, डॉक्टरच्या नावाचे शिक्के जप्त करण्यात आले आहेत.







