बारामती (वृत्तसंस्था) – लवकरच 25 वर्षांवरील तरूणांनाही करोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. ’25 वर्षावरील सहव्याधी तरूणांना करोना लस उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच राज्य सरकार केंद्राकडे मागणी करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते बारामतीत करोना आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना 25 वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध करून देण्याची विनंती करणार आहेत.
करोना लस ही कोणाला द्यायची यासंदर्भातील निर्णय हा केंद्र सरकार घेत असते. दरम्यान, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना करोना लस देण्यात येणार आहे. याआधी केवळ ज्यांना डायबिटीजसारखा आजार आहे, किंवा अन्य आजार आहेत अशा 45 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात होती. आता 45 वर्षांखालील नागरिकांनाही तत्सम व्याधी असतील तर त्यांनाही लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.







