नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या साथीशी लढताना चीनमधील 95 पोलिस अधिकारी आणि 46 वैद्यकीय कर्मचारी शहीद झाले, अशी माहिती चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. जागतिक आरोग्य समस्येशी लढताना झालेल्या बिनीच्या शिलेदारांच्या ( आघाडीच्या पथकातील) मृत्यूबाबत चीनने प्रथमच माहिती उघड केली आहे. कोरोना साथीशी लढताना प्राण गमावलेल्या योध्द्यांच्या स्मरणार्थ शनिवारी हुतात्मा स्मारकाचे अनावरण करण्यात आले. त्या निमित्त ही माहिती उघड करण्यात आली. चीनमध्ये 81 हजार 639 कोरोनाबाधित आढळले. त्यातील बहुतांश या साथीचे केंद्रस्थान असणाऱ्या हुबेई प्रांतातील होते. या लढाईत आघाडीवरील 60 पोलिस अधिकारी तर 35 सहाय्यक भूमिकेतील अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले, असे वृत्त सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले. या संसर्गाशी लढताना 46 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूचा संसर्ग तीन हजार जणांना झाला होता. चीनने हुबेई प्रांतात 42 हजार वैद्यकीय कर्मचारी तैनात केले होते. बाधितांची संख्या वाढताच चीनने 14 रुग्णालय तातडीने उभारली होती. हुबेई प्रांतात 67 हजार 803 बाधित होते. त्यातील 50 हजार आठ रुग्ण केवळ वुहान शहरातील होते.