जळगाव (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने वेबसाईटवर ऑनलाईन ‘दांडीयात्रा’ व्हर्च्युअल चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे 12 मार्च 2021 पासून सुरू करण्यात आलेल्या या चित्रप्रदर्शनास तीन दिवसात जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सदरील चित्रप्रदर्शनास पाच हजाराच्या जवळपास जगभरातील व्हिजिटर्संनी भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदविल्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे आणि दीर्घकालीन जनता आंदोलन म्हणजे ‘दांडी यात्राʼ होय. 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 पर्यंतच्या या यात्रेदरम्यान महात्मा गांधीजींना भारतातील 11 नद्यांना पार करावे लागले. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्र किनारी मूठभर मिठ उचलून हा कायदा मोडला. गांधीजींनी 91 वर्षांपूर्वी 78 लोकांनी मिळून केलेले हे आंदोलन/सत्याग्रह देखील जगातील दहा मोठ्या सत्याग्रहांमध्ये गणले जाते. यंदा दांडी यात्रा शतकी वर्षाकडे वाटचाल करीत आहे या निमित्ताने जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने दांडीयात्रेचे ऑनलाईन चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
इंग्रज शासनाला हादरवणाऱ्या दांडी यात्रा, सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेला अनुभवण्यासाठी https://www.gandhifoundation.net/HDM/ या लिंकवर अवश्य भेट देऊन चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. सदरील चित्रप्रदर्शन 6 एप्रिल 2021 पर्यंत उपलब्ध राहिल.







