जळगावातील आर्या फौंडेशनचा उपक्रम
एरंडोल (प्रतिनिधी ) ;- देशाचे रक्षण करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांच्या कुटुंबाना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते.त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फौंडेशन ही संस्था नेहमीप्रमाणे पुढे सरसावली असून शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करीत आहे.
एरंडोलचे वीर जवान राहुल लहू पाटील यांच्या कुटूंबियांना मदत
पंजाब येथे भारत पाकिस्तान सीमेवर देशसेवा निभावत असतांना एरंडोल येथील सीआरपीएफ जवान राहुल लहू पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले. दि. २८ फेब्रुवारी २०२१,रविवारी वीरमाता संगीता लहू पाटील यांच्या नावाचा रु. ६५०००/-(पासष्ट हजार)चा धनादेश आर्या फौंडेशन चे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी कुटुंबीयांना सुपुर्त केला.या वेळी त्याचेसह सुखकर्ता फौंडेशन चे अध्यक्ष तथा भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ.नरेंद्र ठाकूर हजर होते. डॉ.पाटील यांनी कुटुंबियांना भविष्यात देखील मदतीचे आश्वासन दिले.वीर जवान राहुल यांची आई संगीता, भाऊ गोपीनाथ, बहीण योगिता हजर होते.
संदीप सोमनाथ ठोक(खंडागळी, ता.जि. नाशिक),विकास कुळमेथे(नेरळ,ता.वणी, जि. यवतमाळ),विकास उईके(नांदगाव खंडेश्वर,ता.जि. अमरावती),चंद्रकांत गलांडे(जाशी, ता.माण, जि. सातारा),नितीन सुभाष कोळी(दुधगाव,ता.मिरज,जि. सांगली),सुमेध वामन गवई(लोणाग्रा,ता.जि.अकोला),रवींद्र धनावडे(मोहट मेळा,ता.जि. सातारा),मिलिंद किशोर खैरनार,(नंदुरबार,रा.म्हसरूळ, नाशिक),योगेश मुरलीधर भदाणे(खलाने ता.शिंदखेडा जि. धुळे),कौस्थुभ प्रकाश राणे(मिरा रोड मुंबई),केशव गोसावी(सिन्नर नाशिक),मेजर शशिधरन नायर,(खडकवासला,पुणे)संजय राजपूत(मलकापूर),नितीन राठोड(चोरपांगरा,लोणार जि. बुलढाणा),सुनील वलटे((कोपरगाव),जोतिबा चौगुले(उंबरवाडी, ता.गडहिंगलाज,जि. कोल्हापूर), संदीप सावंत(मुंढे ता.कराड जि. सातारा),सुनील काळे,(पानगाव ता.बार्शी जि. सोलापूर),यश देशमुख(पिंपळगाव, ता.चाळीसगाव जि. जळगाव),ऋषिकेश जोंधळे( बहिरेवाडी ता.आजरा जि. कोल्हापूर),अमित पाटील(वाकडी ता.चाळीसगाव जि. जळगाव),सागर धनगर(तांबोळे बुद्रुक ता.चाळीसगाव जि.जळगाव),राहुल लहू पाटील(एरंडोल).
दानशूरांची आर्या फौंडेशन ला मदत आजवर आर्या फौंडेशन ला जळगाव शहरातूनच नव्हे तर ,राज्य तसेच परदेशातून देखील मदतीचा हात मिळत आहे. यावेळी एरंडोल येथील सुखकर्ता फौंडेशन तसेच शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थांनी सामाजिक भान ठेवत आर्या फौंडेशनच्या या सेवाकार्याला मदतीचा हात दिला हे विशेष.
काश्मिरात आरोग्य सेवा देत असतांना मी नेहमी भारतीय सैन्या सोबत राहत असतो त्यांचे कष्ट अनुभवले आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा व सीमेवरील जवानांचा हुरूप वाढावा या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो
डॉ.धर्मेंद्र पाटील,नेत्ररोगतज्ञ तथा अध्यक्ष, आर्या फौंडेशन, जळगाव







