जळगाव;- आपल्या हाती लागलेल्या शत्रुंच्या स्त्रीयांना सुध्दा सन्मानाने वागविणारा राजा गेला, असे उदगार औरंगजेबने शिवाजी महाराजांनी जेव्हा देह सोडला त्यावेळी काढले. यावरून आपणास शिवाजी महाराजांचे मोठेपण लक्षात येते , असे प्रतिपादन प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यान देतांना केले.

विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने ‘शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक दृष्टीकोन’ या विषयावर डॉ.प्रतिभा अहिरे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता ज्ञानस्त्रोत केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रभारी कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ.अनील डोंगरे, छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख डॉ.अजय पाटील, सहायक कुलसचिव रामनाथ उगले आदी उपस्थित होते. डॉ. अहिरे आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाल्या की, विश्वात अनेक राजे होऊन गेले पण त्यांची जयंती साजरी होत नाही मात्र आज जगात सर्वत्र शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते म्हणून आपण शिवजयंती साजरी करत नाही तर त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आपण शिवजयंती साजरी करतो. ज्या काळात अनेक राज्यांकडे जनानखाने होते त्यात हजारोंच्या संख्येत स्त्री असायच्या त्या काळात शिवाजी महाराजांकडे जनानखाना नव्हता. त्यांच्या दरबारात नाचगाणे झाले नाहीत. शिवाजी महाराजांच्या एक एक गुणांवर स्वतंत्र प्रबंध लिहीता येतील. शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक दृष्टीकोन या विषयी इतिहासातील अनेक प्रसंगावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, शिवाजी महारांजाचा स्त्री विषयी असलेला गुण जर आजच्या राजकीय मंडळी व तरुणांनी घेतला तर देशात महिलांवर होणारे अत्याचार बंद होतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही.पवार होते. सुत्रसंचालन प्रा.विजय घोरपडे यांनी केले हर्षल पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.







