पुणे (वृत्तसंस्था) – पूजा चव्हाण हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सात दिवस उलटून गेले, तरीही पोलिसांनी कोणाही विरोधात गुन्हा दाखल केलेला नसून, अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी दोषींवर त्वरित गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी वानवडी पोलिसांकडे केली आहे. यावेळी ॲड. हितेश सोनार, ॲड.भक्ती पांढरे व ॲड. श्रुती ढमाले उपस्थित होते.

‘पूजा चव्हाणप्रकरणात काही वरिष्ठ लोकांची नावे प्रसारित होत आहेत. तरीही, पोलिसांकडून चव्हाण हिची हत्या झाली की तिला कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले? याचा शोध घेतलेला नाही. आरोप असलेले मंत्रीही गायब आहेत. या पार्श्वभूमीवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 अन्वये दाखल करण्यात आलेल्या अनैसर्गिक मृत्यूच्या नोंदीनंतर पोलिसांनी अनेक संशयितांची नावे समोर येऊन अपेक्षित असा तपास केलेला नाही.
पोलिसांनी नि:पक्षपाती तपास केल्यास पुरावा पुढे येईल. दोषीस शिक्षा व मृताच्या नातेवाईकांला न्याय मिळेल, ‘ अशी अपेक्षादेखील ॲड. ठोंबरे यांनी व्यक्त केली आहेत. पोलिसांनी काहीही कारवाई न केल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावून चव्हाण कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.







