जळगाव ;- पन्नास टक्के विद्यार्थ्यांची रोटेशन पध्दतीने उपस्थिती ठेवुन, कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी करुन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळा १५ फेब्रुवारी पासून नियमित सुरु होत असून विद्यापीठाने तसे परिपत्रक निर्गमित केले आहे.
राज्यात कोविड-१९ ने बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत उच्च व तंत्र शिक्षण मत्री उदय सामंत यांनी १ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कुलगुरुंशी महाविद्यालये सुरु करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगानेही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन विद्यापीठाने परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना पत्र पाठवून विद्यापीठ अधिक्षेत्रातील महाविद्यालये कोरोना प्रादूर्भाव विचारात घेऊन सुरु करता येतील का याबाबत विचारणा केली होती. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त पत्र, राज्य शासनाच्या सूचना, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन तसेच ५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक घेतली. महाविद्यालयातील वर्ग कशा पध्दतीने सुरु करता येतील याबाबत प्राचार्यांची ऑनलाईन बैठक विद्यापीठाने घेतली. सर्व सूचना व कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाय योजनांची अंमलबजावणी करणे तसेच इतर अटी व शर्ती नमूद करुन, पन्नास टक्के विद्यार्थ्यांची आळीपाळीने उपस्थिती ठेवून महाविद्यालये १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक ६३/२०२१, दि१० फेब्रुवारी नुसार कळविले आहे. सदर परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी दिली.