जळगाव;- गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने महात्मा गांधी यांच्या 73 व्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वेबसाईटवर ‘महात्मा को नमन’ या व्हर्च्युअल चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० जानेवारी ते दि. 12 फेब्रुवारीदरम्यान (12 फेब्रुवारी रोजी भारतातील विविध राज्यांसह खान्देशातील प्रकाशा येथेही तापी नदीत महात्मा गांधीजींच्या अस्थिंचे विर्जन केले होते. त्या औचित्यान 12 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन ऑनलाईन ठेवले गेले आहे. ) हे प्रदर्शन ऑनलाईन बघता येत आहे. http://www.gandhifoundation.net/MKN/ या लिंकवर असलेल्या ऑनलाईन प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत जगभरातील शेकडो व्हिजिटर्सने या प्रदर्शनास भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदविलेल्या आहेत.

या प्रदर्शनात महात्मा गांधीजींची अंतिमयात्रा, अंतिमसंस्कार, अस्थिकलश यात्रा, अस्थिविसर्जन व त्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींसोबतच महनीय व्यक्तिंनी वाहिलेली श्रद्धांजली इत्यादींचा समावेश असलेल्या 72 स्लाईड् आहेत. वैश्विक पातळीच्या अनेक बाबी बघण्याची अनमोल संधी या निमित्ताने जळगावकर नव्हे तर जगभरातील अभ्यासकांना गांधी रिसर्च फाउंडेशनने उपलब्ध केली आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, महात्मा गांधी व स्वातंत्र्यसंग्रामाशी निगडित अमूल्य दस्तावेज यात पत्र, डायऱ्या, पुस्तके, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती, मानपत्रे, टपाल तिकीटे आदी विविध साहित्याचा संग्रह या अभिलेखागारात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संशोधक या साहित्याचा संदर्भ घेऊन आपला अभ्यास करीत आहेत.
गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीतीर्थमधील संग्रहित, ऐतिहासिक, दूर्मीळ 72 चित्रांच्या आधारे ‘महात्मा को नमन’ हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. यावर्षी हेच प्रदर्शन महात्मा गांधी उद्यानात लावण्यात आले होते. या प्रत्यक्ष भरवलेल्या चित्र प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. यापूर्वी 2019 ला 35 दूर्मीळ चित्रांचा समावेश असलेले असेच चित्र प्रदर्शन गांधी रिसर्च फाउंडेशनने साकारले होते. 2019 ला ‘बा-बापू १५०’व्या जयंती वर्षाच्या औचित्याने या साहित्य भंडारातील निवडक साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम करण्यात आला होता. महात्मा गांधी उद्यानात हे प्रदर्शन बघण्याची संधी ज्यांची हुकली असेल त्यांनी http://www.gandhifoundation.net/MKN/ या लिंकवर अवश्य भेट देऊन चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.







