तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) – एका महिलेने स्वत:च्या सहा वर्षीय बाळाची हत्या केली. केरळच्या पलक्कड भागात ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण केरळ हादरले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही एका मदरश्याची शिक्षिका आहे.

तिने अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याची शक्यता आहे. आपला एक मुलगा परमेश्वराला समर्पित करण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे. संबंधित महिला सध्या गर्भवती आहे. तिला तीन मुले होती. यापैकी सर्वात लहान तिसऱ्या मुलाची तिने हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. निष्पाप बालक आपल्या आईसोबत अंथरुणावर झोपला होता. त्याची आई त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली. तिने आपल्या मुलाचे पाय बांधले. त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली. घटना घडली तेव्हा महिलेचा पती सुलेमान दुसऱ्या खोलीत झोपला होता. त्यामुळे त्याला कोणताही आवाज आला नाही.
आरोपी महिलेचे वय 30 वर्ष आहे. तिने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वत: पोलिसांना फोन करुन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय तिने नातेवाईकांनाही सांगितले. अल्लाहसाठी मुलाचे बलिदान दिले, असे महिलेने पोलिसांना सांगितले.
काही लोकांच्या मते, तिने अंधश्रद्धेला बळी पडून अशा प्रकारचे कृत्य केले. मात्र, महिलेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने संबंधित परिवार अंधश्रद्धेला बळी पडणारा नाही, असा दावा केला आहे.







